शाळेत असणारा माझ्यातला सगळा रेबेलियस ऍटिट्युड कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात सुतासारखा सरळ झाला. जिथे नियम नाहीत, तिथे रेबेल बनून काहीही उपयोग नाही हे त्या पहिल्या आठवड्यात जाणवले. कॉलेजमध्ये नियम नव्हते असं नाही, पण त्याला शाळेची सर नव्हती.
शाळेचा यामुळेच प्रचंड तिटकारा यायचा. ते दररोजचे सहा-सात तास म्हणजे एक अग्निपरीक्षा होती. नियमांनी जखडलेल्या पुरातन काळी इमारतीत आमचे रुढीवादी आणि पुरातन प्रेमी शिक्षक अगदी डोक्यावर बसून मेंदू खायचे. कसलं डबकं झालं होतं जगणं.
बरं हे सगळे विचार अव्यक्त कधीच नव्हते. जवळपास शाळेत सगळ्यांना हा शाळेबद्दलचा माझा दुःस्वास माहितीच होता. पाठ्येतर विषयांमध्ये मग जास्त वेळ द्यायला लागलो. शाळेत जाणं जवळपास फक्त गरज म्हणून राहिलं. शिक्षक म्हणूनच की काय नेहमी पेटल्यासारखेच वागायचे. "हां, मग काय बंग, आता कुठला विज्ञान प्रकल्प काढलात, का जत्रा होती या वेळेस?" पकडून पीडायचे सगळे. म्हणजे सुरुवातिला काही वर्षं पीडलं, नंतर माझा निगरगट्टपणा वाढीस लागला.
नियम मोडण्यासाठीच केले गेलेयत असं आणि शिक्षक, वरिष्ठ आणि अधिकारीगण हे आपल्या उपेक्षेखातरच बनवल्या गेलेयत असं काहीतरी मी मानायलो लागलो. बऱ्याचदा हे अंगलट आलं, डिटेंन्शन मिळालं, पण बहुतांशी तावडीतून सुटण्यासाठी चलाखी आणि चातुर्य कामी आलं.
ते सगळं कॉलेजमध्ये येताच संपलं. म्हणजे असं मला वाटलं. कॉलेज वॉज फॉर फ़्री बड्र्स! तिथे काही कायदेच नव्हते. मी खुश होतो.
ते दिवस आता फक्त आठवण बनून उरले आहेत की काय असा मी विचार करायचा अवकाश की स्वभावातल्या बेदरकारपणाने पुन्हा एकदा उफाळी मारायला सुरुवात केली. किती वर्षं झालीत, पण सुप्तावस्थेत अजुनही तो ऍटिट्युड आहेच. स्तर आणि तीव्रता बदललीये, पण तरीही आहेच. कायदे आणि नियमांकडे तसंच तुच्छतेने बघणं सुरुच आहे, आणि 'आय ऍम माय ओन बॉस' हा ऍटिट्युडही अजुन आहे. लॅब मधलं काम असू देत, ऑर्केस्ट्रात गाणं असू देत, किंवा कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय असू देत, काहीही का असेना, मी आपले नियम आणि कायदे स्वतः बनवणार, बनवायलाच हवेत असं मला अजुनही तीव्रतेने वाटतं.
ह्याला कसं, कुठल्या स्तरावर आणि किती लवचिकपणे उपयोगात आणायचं हे मला नेहमीच ऐकायला मिळालं आणि मी तेवढा व्यवहारीपणा शिकलोय पण. तरीही कधीतरी अधुन-मधुन ते अचानकपणे असं वर तोंड काढतंच.
Saturday, March 31, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
ह्यात तर जगण्यात मजा आहे. मळलेल्या वायवाटेने तर सर्वच चालतात जगावे कसे आपल्याच मस्तीत
Revolutions are not born on the streets.
They rise in your mind.
The world needs more living heroes. And you are here just in time.
-The world is watching you.
Thanks guys, what an encouragement!
Post a Comment