लहान असताना प्रत्येकालाच असं वाटतं की फक्त आम्हाला वाटायचं हे आता सांगता येणार नाही, पण एकूण लहानपणीचा आमचा आविर्भाव असा होता की आपल्याला काहीही करून जग बदलायचे आहे. त्यामागचा हेतू, प्रश्न, उत्तरं, अडचणी यांचे भान अजिबात नव्हते. सभोवतालच्या व्यक्ती, आणि त्यांचे विचार यातून तयार झालेला आदर्शवाद आणि स्वच्छंदतावाद, आणि त्या दोन्हींच्या मिश्रणातून तयार झालेले एक अजब रसायन मनात पूरेपूर भिनलेले होते. आमच्या सभोवती असणाऱ्या सगळ्यांना क्रांती हवी होती. तसले शब्द कळत नसतानाही जगात बरेच काही चुकीचे चालले आहे, आणि ते सगळे आपण बदलायला हवे, ही भावना मनात रुजलेली ती त्यामुळेच. थोडे मोठे झाल्यावर मग जीवशास्त्र आणि उत्क्रांतीवाद शिकायला सुरुवात केल्यावर असे जाणवायला लागले की माणसांच्या संदर्भात उत्क्रांती ही बाकी जीवांसारखी फक्त अणू-रेणू-गुणसूत्रांपुरती मर्यादित नसते. सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक या आणि अशा अनेक मानवकेंद्रित पटलांवर, चूकीचे मिटवून नवे लेखांकृत करणे देखील आपली उत्क्रांतीच.
व्यावहारिकता आणि वास्तविकतेशी सुताचाही संबंध नसलेला हा आदर्शवाद घर सोडल्यानंतर बाहेरच्या जगाशी संपर्क येताच भंगला. काचेच्या पारदर्शक भिंतीतून दिसणाऱ्या जगाशी सरळ भिडण्याचा मौका मिळाल्यावर आदर्श विचारांना वास्तविकतेचा चिरा मिळाला. आरपार चिरा गेलेल्या काचेरी भिंतीचे तुकडे गोळा करताना किती त्रेधा उडाली! नाकी नऊ आणि चेहेऱ्यावर बारा. काही केल्या समजत नव्हते की आपण आजपर्यंत वस्तूस्थितीच्या इतक्या दूर कसे होतो?
मग हे लक्षात आले की वस्तुस्थिती कोणाची? प्रत्येक जण आपल्यासोबत आपली तत्त्वं आणि वास्तविकता घेऊन फिरत असतो. आपल्यासारखेच विचार करणारे कमी असू शकतील, पण त्यामुळे आपले विचार चूकीचे होत नाहीत. अल्पसंख्यकता हे चूक मोजण्याचे परिमाण होऊ शकत नाही हे जेव्हा कळले आणि पटले, त्यानंतर मग सगळी भीती गेली, सगळ्या शंका मिटल्या. आपल्या तत्त्वांवर पुन्हा एकदा विश्वास आला. आणि ती दुसऱ्यांना समजवण्याची क्षमता पण आपोआप आली.
Monday, April 11, 2011
Subscribe to:
Posts (Atom)